पुणे – श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची होणारी गर्दी व विविध सुविधांचा विचार करून प्रशासन व मंदिर समितीने अधिकृत संकेतस्थळ स्थापन करावे. भाविकांना सर्व आवश्यक सोयीसुविधा तात्काळ मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली श्रावणी सोमवार यात्रा नियोजनबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, प्रशासकीय व्यवस्थापक प्रमोद शिर्के, सह-कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, व अन्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्रीक्षेत्र भीमाशंकरला श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता व्हीआयपी व साधी अशा दोन रांगेत दर्शन व्यवस्था करावी. पोलीस विभागाने वाहनतळाची ठिकाणे निश्चित करून तेथे चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. वन विभागानेही रस्त्यातील अडथळे दूर करून भाविकांची गैरसोय होऊ नये व त्यांना चांगल्या सुविधा देता याव्यात, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या. सर्व कामे येत्या रविवारपर्यंत पूर्ण करावीत, तसेच मंदिर परिसर, भीमाशंकर गाव, मंचर या ठिकाणी क्यूआर कोडबाबत माहिती देणारे फलक लावून व्हीआयपी दर्शन सुविधा उपलब्ध करुन द्यावी, तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधांची माहिती उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना डुडी यांनी दिल्या.