Pune Protest: रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यास थेट गुन्हा; अलका चौक, एफसी रोडसह ‘या’ ५ प्रमुख चौकांत आंदोलनास बंदी
Pune Protest: अचानक गर्दी जमवून वाहतूक विस्कळीत केल्यास खैर नाही; पोलिसांनी आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा दिला पर्याय.

Pune Protest – वारंवार रस्त्यावर उतरून होणाऱ्या आंदोलनाबाबत पुणे पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. एफसी रोड, जेएम रोड, बालगंधर्व चौक, अलका चौक आणि खंडोजीबाबा चौक आदी प्रमुख ठिकाणी आंदोलनास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससी परीक्षांसंदर्भातील मागण्यांसाठी विद्यार्थी या प्रमुख ठिकाणी सतत आंदोलन करत असतात. आता त्यांना परवानगी दिलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करता येणार आहे.
तसेच आंदोलनाची घोषणा किंवा आवाहन सोशल मीडियावर करण्यापूर्वीही पोलिसांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीएससी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ही भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियावर आंदोलनाचे आवाहन करून अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात.
त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यापुढे कोणतेही आंदोलन, मोर्चा, धरणे किंवा रास्ता रोको करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य असेल, असे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या मते, गेल्या काही वर्षांत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला.
त्यामुळे या संवेदनशील भागांत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर या परिसरात विनापरवानगी जमाव जमविणे किंवा आंदोलन करण्यावर बंदी असेल. एमपीएससी परीक्षेतील ऑफलाइन परीक्षा, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि रखडलेल्या भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या मागण्यांसाठी विद्यार्थी सातत्याने आंदोलन करत आहेत.
अनेक आंदोलने अचानक उभी राहिल्याने वाहतुकीवर परिणाम होत असतो. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित असला तरी विनापरवानगी सोशल मीडियावर आवाहन करून गर्दी जमविणे किंवा प्रतिबंधित ठिकाणी आंदोलन केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
येथे आंदोलनाची परवानगी
विद्यार्थ्यांना आपल्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्याची मुभा दिली आहे. ओंकारेश्वर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यास पोलिसांनी तत्त्वतः सहमती दर्शविली आहे. मात्र, शहरातील प्रमुख चौकांमध्ये रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरणारे आंदोलन सहन केले जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






