Pune : नऊ उड्डाण पुलांचा प्रस्ताव लालफितीत

पुणे : वाहनचालकांना जुना पुणे- मुंबई महामार्गावरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सात वर्षांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाकडे पाठविला. मात्र, या प्रस्तावाला अद्यापही मान्यताच मिळालेली नाही.
जुन्या पुणे- मुंबई महामार्गाचा वापर प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव, कामशेत या ठिकाणी जाण्यासाठी करण्यात येतो. या महामार्गावरून पुढे द्रुतगती महामार्गावरसुद्धा जाता येते. नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
या महामार्गावर तळेगाव येथे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. तळेगाव, वडगाव मावळ, चाकण येथे औद्योगीकीकरण वाढल्याने जड वाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे, तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात.
त्यामुळे दरडी काढण्याच्या कामादरम्यान किंवा मोठा अपघात होऊन वाहतूक कोंडी झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वळवली जाते, तसेच सलग येणाऱ्या सुट्टयांमुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या सर्व बाबींचा विचार करून एमएसआरडीसीने जुन्या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाकडे पाठविला आहे. मात्र, त्यास अजूनही मान्यता मिळाली नसल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यासाठी उड्डाणपुल आवश्यक
– जुना पुणे -मुंबई महामार्गाकडेला मोठ्या प्रमाणावर नागरीकरण
– या रस्त्यावरू जाणाऱ्या वाहनांची संख्येतही वाढ
– नागरीकरणामुळे महामार्गावरील चौकात यु टर्न घेण्यासाठी, तसेच पलीकडे वळण्यासाठी मुख्य रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे एखाद्या वाहनाने वळण घेण्यासाठी गाडी थांबली, तरी पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात.
– उड्डाणपुल झाल्यानंतर महामार्गावरील वाहतुकीचा वेग वाढणार
या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित
सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तळेगाव चाकण रस्ता, एमआयडीसी वडगाव , देहूरोड वाय जंक्शन, वडगाव फाटा, निगडी फाटा ते कामशेत, कार्ला फाटा, कान्हे फाटा अशा नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले आहे.




