Pune : पूर्वमोसमी पावसाने घेतला २५४ झाडांचा बळी

पुणे : शहराला पूर्वमोसमी पावसाने दिलेला तडाखा आणि त्यानंतर आता मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे शहरात मे महिन्यात तब्बल २५४ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. या वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. मे महिन्यात झाडे पडण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तर, या झाडपडीमुळे एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जुनी झाडे कोसळत असल्याने महापालिकेची विकासकामे झाडांच्या मुळावर उठली असून, झाडांची मुळे तसेच खोड कमकुवत होत असल्याने हे प्रकार वाढल्याचे चित्र आहे.
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर-घोले रोड प्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्वाधिक ३९ घटना घडल्या आहेत. यानंतर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात ३१, वारजे-कर्वेनगरमध्ये २९, हडपसर-मुंढवामध्ये २५, धनकवडी-सहकारनगरमध्ये २४, ढोले-पाटील रोडमध्ये २३, नगर रोडमध्ये १९, औंध बाणेरमध्ये १८, तर केवळ बाणेरमध्ये १३ घटनांची नोंद झाली. कोळगाव येथे ३१ झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. बावधन आणि विश्रामबागवाडा, बिबवेवाडीमध्ये ६, भवानी पेठेत २, वानवडी-रामटेकडीमध्ये १ घटना घडली. कोंढवा-येवलेवाडी परिसरात झाड पडण्याची एकही घटना घडलेली नाही.
१३८२ धोकादायक झाडे आणि फांद्या तोडण्यास मान्यता
महापालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व आणि मे महिन्यात आतापर्यंत शहरातील विविध भागांत एकूण १३८२ धोकादायक झाडे आणि फांद्या काढून टाकण्यात आल्या आहेत. शहरातील धोकादायक झाडे काढून टाकण्यासाठी खासगी मालमत्ताधारकांकडून एकूण १,३१६ अर्ज प्राप्त झाले होते, यापैकी ११३४ अर्ज मंजूर करण्यात आले. त्याच वेळी, पालिकेच्या मालकीच्या ठिकाणांवरील झाडे हटवण्यासाठी एकूण २९५ अर्ज प्राप्त झाले, यापैकी २४८ अर्ज मंजूर झाले आहेत. प्रशासनाच्या दाव्यानुसार, एकूण १३८२ धोकादायक झाडे आणि फांद्या काढून टाकण्यात आल्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मागील महिन्यांतील झाडे पडण्याच्या घटना
जानेवारी : २५
फेब्रुवारी : २९
मार्च : ३९
एप्रिल : ७२
मे : २५४





