पुणे – पिरंगुटला बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने तुटलेल्या वीज वाहिनीमुळे भूगाव, पिरंगुटसह परिसराचा वीजपुरवठा रविवारी दुपारी २ च्या सुमारास बंद झाला होता. महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर २४ तासाने वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. पिरंगुट येथे एमएसआरडीसीच्या पुलाचे काम सुरू आहे. तेथे संबंधित विभागाने भराव टाकून काम सुरू केले होते. रविवारी दुपारी पावसाच्या पाण्यामुळे टाकलेला भराव वाहून गेला. त्यामुळे २२ केव्ही स्कायआय वीज वाहिनी चार ठिकाणी तुटली. परिणामी २० हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरुवातीला बंद झाला. रविवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरूच होते; परंतु संततधार पाऊस व वाहत्या पाण्यामुळे काम थांबवले. सकाळी पाणी कमी होताच पुन्हा कामाला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी काही ग्राहकांचा पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू केला. त्यातही अनेकदा व्यत्यय आला. सकाळी ११ वाजता गणेशखिंडमार्गे भूगावचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. सोमवारी दुपारी ३ नंतर सर्व स्कायआय वाहिनीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुळशी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले, शाखा अभियंते दाम्पलवार, नितीन धस व मनोज काळे यांच्यासह भूगाव, भूकुम आणि खातपेवाडीतील वीज कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली.