पुणे : आधार कार्ड अपडेटसाठी पोस्टाचे विशेष अभियान

पुणे – शहरातील पाच वर्षांपेक्षा जुनी आधारकार्ड असलेल्या नागरिकांनी त्यांचे आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे, यासाठी पुणे टपाल विभागातर्फे 7 ते 11 सप्टेंबरदरम्यान विशेष अभियान राबविले जाणार आहे.
पुण्यामध्ये 92043 आसे आधार कार्ड आहेत. जे 5 वर्षांपूर्वी काढलेले आहेत. त्यांना नूतनीकरण/अद्ययावत करणे गरजेचे आहे. कारण त्यावर जुने मोबाइल नंबर आहेत अथवा बायोमॅट्रिक अद्ययावत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. आता बॅंकेची कामे, पॅनकार्ड, विविध सबसिडी, पासपोर्ट आणि आरटीओ संदर्भातील कामे करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते. याचा विचार करून पुणे पोस्टल रिजनच्या प्रमुख जी. मधुमिता दास यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, पंढरपूर, श्रीरामपूर या विभागातील सर्व पोस्ट कार्यलयात किंवा पोस्टमनतर्फे विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.





