पुणे पोलीस दलात “बदल्यांची संगीतखुर्ची’

पुणे (संजय कडू) – पुणे पोलीस दलात मागील काही महिण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या सातत्याने बदल्या होत आहेत. पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारुन एक -दोन महिणे होत नाहीत तोच त्यांची उचलबांगडी होत आहे. पोलीस स्टेशन ते साईड ब्रँच, सॉईड ब्रँच ते पोलीस स्टेशन/गुन्हे शाखा अशी सातत्याने संगित खुर्ची त्यांना खेळावी लागत आहे. (Pune Police Transfer News)
पोलीस स्टेशनची हद्द समजण्याआधीच अनेकांची बदली झाली आहे. दरम्यान आज पुन्हा वीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे शिस्तप्रीय आणि गुन्हेगारांमध्ये दहशत असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात. यामुळे त्यांनी कार्यभार स्विकारताच काही पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत:हून साईड ब्रँचला बदली करुन घेतली होती. तर सध्याही अनेकजण पोलीस स्टेशन नको पण साईड ब्रँच द्या, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारलेल्यांना पोलीस आयुक्त एक दोन महिण्यातच उचलबांगडी करत आहेत. यामुळे नक्की करायचे काय? आणि पोलीस आयुक्तांची भुमिका काय असा प्रश्न सर्व अधिकाऱ्यांना पडला आहे.
पोलिस आयुक्तांनी कारभार स्विकारताच शहरातील अवैध धंदेवाले तसेच सराईत गुन्हेगारांची शाळा घेतली होती. यामुळे गुन्हेगारांमध्ये त्यांची चांगलीच दहशत बसली आहे. मात्र त्याहीपेक्षा आता सातत्याने होणाऱ्या खात्याअंतर्गत कारवाई आणि बदल्यांमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्येच दहशत माजली आहे.
अधिकाऱ्यांची बदली होण्यामागे छोटीशी चुकही कारणीभूत ठरत आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी आत्मविश्वासच गमावला आहे. नव्याने कोणी पोलीस ठाण्याचा कारभार स्विकारण्यास तयार नसताना जे आहेत त्यांनाही हटवले जात आहे. ज्यांची मनापासून ईच्छा नाही अशांवरही पोलीस ठाण्याचा कारभार सोपवला जात आहे.
…कारवाईच्या टांगत्या तलवारीने झोप लागेना –
एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एखादी घटना घडली तर त्या ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. त्यांच्यावर नको नको त्या प्रश्नांचा भडिमार केला जात आहे. यामुळे आपल्या हद्दीत काही घडू नये, तसेच काही घडले तर त्याचे खापर आपल्यावर पडू नये म्हणून भल्या भल्या अधिकाऱ्यांना रात्र रात्रभर झोप येत नाही.
सतत तणावाखाली राहिल्याने अनेकांचे मनस्वास्थ आणि आरोग्यही बिघडले आहे. यामुळे हद्दीत घडलेली एखादी घटना काहींच्या पथ्यावर पडली आहे, आपसुखच साईट ब्रँचला बदली झाल्याने काहींनी झाले ते बरे झाले असा सुर आवळला आहे.
वसुली अंमलदारांचे पुर्नवसन चार पोलीस ठाण्यांत –
पुणे शहरातील अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घातल्याचा आरोप ठेवून विविध पोलीस ठाण्यातील ६५ पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष शाखेत संलग्न करून त्यांना उजळणी पाठ्यक्रमासाठी पाठवण्यात आले होते. या सगळ्यांना चार पोलीस ठाण्याचे पर्याय देऊन बदली करण्यात आली. त्यांना बंडगार्डन, विश्रामबाग, स्वारगेट आणि शिवाजीनगर असे पर्याय देण्यात आले होते.





