Pune Police : ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांची खैर नाही; पोलीस आयुक्तांनी स्वतः घेतली ‘तळीरामांची’ शाळा
Pune Police : वर्षभरात ६ हजार तळीरामांवर कारवाई; आता दर आठवड्याला पोलीस मुख्यालयात 'या' गुन्हेगारांना हजेरी बंधनकारक.

Pune Police – मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांना वठणीवर आणण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि. २) पोलीस मुख्यालयात अशा वाहनचालकांची थेट शाळा घेतली. यापुढे ड्रंक अँड ड्राइव्ह खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला.
या विशेष मार्गदर्शन शिबिराला मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई झालेल्या एक हजारांहून अधिक चालकांची उपस्थिती होती. हे शिबिर रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, मद्य पिऊन वाहन चालवल्याने फक्त तुमचा नव्हे तर निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येतो. यापुढे अशा चालकांवर अशी कारवाई केली जाईल की ते आयुष्यभर लक्षात राहील. वाहन जप्तीबरोबरच सार्वजनिक जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल. मागील दोन वर्षांच्या तुलनेत २०२५ मध्ये तब्बल ६ हजार चालकांवर ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई करण्यात आली.
यापुढेही पोलीस टार्गेटेड मोहिमांद्वारे ही कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दर आठवड्याला पोलीस मुख्यालयात समुपदेशन शिबिरे घेण्यात येणार आहेत. ड्रंक ड्रायव्हिंग रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या चालकांना शिबिरास उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
किर्तनकाराची चाचणी निगेटिव्ह…
एका किर्तनकाराने मी दारू पिलेली नव्हती, अशी तक्रार मांडली. तपासात त्यांची चाचणी निगेटिव्ह आढळली असून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.




