Kondhwa News : क्षणाचा निर्णय अन् दोन जीव वाचले! पुण्यात पोलिसांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळांवरून तरुण-तरुणीची सुखरूप सुटका
Kondhwa News : पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी कारवाईमुळे एक अत्यंत मोठा आणि भीषण अपघात टळला आहे.

Kondhwa News : सय्यद नगर रेल्वे गेट येथे कर्तव्यावर असताना एका महिलेने रेल्वे पटरीवर एक तरुण आणि एक तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच संबंधित महिलेला तात्काळ 112 वर संपर्क साधण्यास सांगून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. (Kondhwa News)
रेल्वे रुळांवर पोहोचताच पोलिसांनी दोघांची शांतपणे समजूत काढली आणि त्यांना सुरक्षितपणे रुळांवरून बाजूला आणले. वेळेत केलेल्या या धाडसी आणि संवेदनशील हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर तरुणीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले, तर तरुणाला पुढील समुपदेशन व आवश्यक कार्यवाहीसाठी मार्शल पथकाच्या ताब्यात देण्यात आले. (Kondhwa News)
या संपूर्ण बचावकार्यात पोलीस हवालदार सुनील आगलावे, पोलीस हवालदार महेश पाठक आणि पोलीस हवालदार सागर शेडगे यांनी तत्परता, धाडस आणि प्रसंगावधान दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे दोन जीव वाचले असून, परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. (Kondhwa News)





