Pune : पोलीस वसाहत दोन दिवस पाण्याविनाच

पुणे : शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील २२ मजली इमारतीत मागील दोन दिवसांपासून वीजबिल थकल्याने पाणीपुरवठा खंडित झाला असून, सोसायटीतील सार्वजनिक ठिकाणची वीजही बंद झाली आहे. वीजबिल तातडीने भरण्याची मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विनंतीनंतर महावितरणने वीज तात्पुरती सुरू करून दिली आहे.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात बैठ्या चाळींच्या जागी २२ मजली दोन इमारती ४ वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या. राजगड आणि शिवनेरी अशी इमारतींची नावे आहेत. राज्यात पहिल्यांदाच पोलीस वसाहतीत गगनचुंबी इमारत बांधण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पाठपुरावा केला होता. या इमारतीत पाणीपुरवठा, लिफ्ट, तसेच वापरातील जागेत बसविलेल्या दिव्यांसाठी (काॅमन स्पेस) ३ वीज मीटर बसविले आहेत. त्याचे बिल शासनाकडून जमा करण्यात येते.
पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत हे बिल महावितरणला अदा करण्यात येते. शासनाने एप्रिल २०२४ पासून बिलाचे पैसे पोलीस आयुक्त कार्यालयात जमा न केल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या मीटरवर कारवाई करून महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तेथील रहिवासी विशेषत: महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दैनंदिन वापरातील पाणी तळमजल्यावरून आणावे लागत असल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मेटाकुटीस आले आहेत. पोलीस कर्मचारी १२ – १४ तास काम करतात. त्यात घरी आल्यावर अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पंपांची वीज खंडित केली असून, येत्या दोन दिवसांत लिफ्टचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. लिफ्ट बंद पडली, तर २२ मजले चढून रहिवासी जाणार कसे ? असा सवाल उपस्थित होत आहे.
पाणीपुरवठ्याच्या मीटरचे बिल ३४ लाख रुपये आहे. त्यापैकी १७ लाख रुपये आयुक्त कार्यालयाने अदा केले आहे. उर्वरित बिलाचे पैसे शासन जमा करणार आहे. शासनाला तसे पत्र पाठवले असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
– संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त





