Pune Police: पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरात वाढणार १३५ नवीन पोलीस चौक्या; गुन्हेगारीवर बसणार लगाम
Pune Police: वाढती लोकसंख्या आणि शहराच्या विस्तारामुळे पुणे पोलिसांचा गृह विभागाकडे प्रस्ताव; लवकरच मिळणार अंतिम मंजुरी.

Pune Police – वाढती लोकसंख्या, शहराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून पुणे शहरात नव्याने पोलीस चौक्यांची स्थापना करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन पोलीस चौक्या कार्यरत असाव्यात, या उद्देशाने पुणे पोलिसांनी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू केली असून, लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
यामुळे शहरात किमान १३५ चौक्या वाढण्याची चिन्हे आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बंद पडलेल्या सर्व पोलीस चौक्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना स्थानिक पातळीवर पोलिस सेवा मिळणे सुलभ झाली आहे. या उपक्रमानंतर आता शहरातील वाढत्या गरजेनुसार नव्या चौक्यांची उभारणी करण्यावर भर दिला जात आहे.
राज्य शासनाने गेल्या वर्षी मांजरी, लक्ष्मीनगर, नऱ्हे, लोहगाव आणि येवलेवाडी येथे पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली होती. ही सर्व ठाणी कार्यान्वित झाली असून, त्यामुळे पोलीस दलाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. नव्या ठाण्यांपैकी काही ठाणी अद्याप पोलीस चौकीच्या इमारतीतूनच कामकाज करत आहेत.सध्या सायबर पोलिस ठाण्यासह शहरात ४५ पोलीस ठाणी आणि ११० पोलीस चौक्या कार्यरत आहेत.
मात्र, शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत ही संख्या अपुरी असल्याचे पोलीस प्रशासनाचे मत आहे. किमान १३५ पोलीस चौक्यांची आवश्यकता असून, त्यानुसार नवीन चौक्यांचे नियोजन करण्यात येत आहे.नव्या पोलीस चौक्या सुरू झाल्यानंतर नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी दूरवर जावे लागणार नाही. घटनास्थळी पोलीस जलद पोहोचतील, स्थानिक गस्त वाढेल आणि गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.
“शहरातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दी मोठ्या असल्याने प्रत्येक ठाण्याअंतर्गत किमान तीन पोलीस चौक्या असणे आवश्यक आहे. त्यासाठी नव्या चौक्यांचा प्रस्ताव लवकरच गृह विभागाकडे पाठविण्यात येणार असून, त्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास आहे.”
– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त






