Rohit Shetty Firing Case : प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहूतील निवासस्थानासमोर गोळीबार करुन पसार झालेल्या पाच जणांना वारजे पोलिसांनी अटक केली. मुंबई गुन्हे शाखेचे पथक पसार आरोपींचा शोध घेत होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलिसांच्या पथकाने वारजे, कर्वेनगर, धायरी, नऱ्हे भागात कारवाई करुन पाच जणांना ताब्यात घेतले. सिद्धार्थ दीपक येनपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, आदित्य ज्ञानेश्वर गायके, अमन आनंद मराठे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुंबईतील जुहू परिसरात दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी (३१ जानेवारी) रात्री घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नव्हते. शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. गुंड लाॅरेन्स बिष्णेाई याचा निकटवर्तीय आरजू बिष्णोई याने साथीदारांशी संगनमत करुन गोळीबार केला. समाज माध्यमात बिष्णोई याने ध्वनीफीत प्रसारित केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी जुहू परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले होते. तांत्रिक तपासात पसार झालेले आरोपी पुण्यातील वारजे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने याबाबतची माहिती पुणे पोलिसंना कळविली. वारजे पोलिसांच्या पथकाने पाच संशयितांना वारजे, कर्वेनगर, नऱ्हे, धायरी भागातून ताब्यात घेतले. त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.