Pune News : एरंडवणेत दरोड्याच्या तयारीत पाच जणांना अटक; धारदार हत्यारे, लाल तिखटाची पावडर जप्त
Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात गस्त आणि बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात गस्त आणि बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याचदरम्यान डेक्कन पोलिसांनी एरंडवणे परिसरात दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून धारदार हत्यारे, लाल तिखटाची पावडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Pune News)
डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार सचिन गायकवाड यांना एरंडवणे येथील मित्र मंडळ (चावडी) परिसरातील गणेश मंदिराच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही जण दरोड्याच्या तयारीने थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. (Pune News)
माहिती मिळताच पोलिस पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेतली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा उघडण्यास पोलिसांनी सांगितले. दरवाजा उघडल्यानंतर खोलीत पाच जण आढळून आले. त्यांच्या जवळील टेबलवर धारदार हत्यारे, लाल तिखटाची पावडर आणि अन्य साहित्य पोलिसांना आढळले. (Pune News)
पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
या कारवाईत रितेश गुरुनाथ चिप्पा (२५, गंजपेठ), विकास नितीन लांबोर (१९, खिलारेवाडी), प्रतिक हनुमंत कांबळे (१९, गणेशनगर, एरंडवणे), प्रतिक रामचंद्र कदम ऊर्फ बाबू (२३, खिलारेवाडी) आणि सुजल मनोज मोरे (१९, इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune News)
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गर्दीचा फायदा घेऊन गुन्हेगारी कारवाया होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून विशेष पेट्रोलिंग करण्यात येत आहे. या कारवाईमुळे संभाव्य दरोड्याचा प्रयत्न रोखण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Pune News)
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे आणि सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रणजितसिंग परदेशी आणि सपना देवतळे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने ही कारवाई केली. (Pune News)
पोलिस उपनिरीक्षक योगेश मोरे, अजय भोसले, सहायक पोलिस फौजदार दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर तसेच पोलिस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीग सिद्धकी, धनाजी गाळी आणि स्वप्निल गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला. (Pune News)





