Pune : पोलीस पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात ! न्यायालयीन कामकाजानंतर परत कारागृहात नेलेल्या आरोपीकडे आढळले चरस

पुणे : पोलिसांचे बंदोबस्तावरील गार्ड पुन्हा एखदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून न्यायालयात आणि तेथून पुन्हा कारागृहात कैद्यांना पोलीस बंदोबस्तात नेले जाते. शिवाजीनगर न्यायालयातून (Shivajinagar Court) कारागृहात नेण्यात आलेल्या कैद्याकडे कारागृहाच्या प्रवेशद्वारात 25 ग्रॅम चरस (Charas) सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई आहे.
शुभम उर्फ बारक्या हरिश्चंद्र पास्ते असे आरोपीचे नाव आहे. पास्ते खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याच्याविरोधात पास्तेविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2017 पासून तो कारागृहात आहे.(pune Crime)
मंगळवारी (दि.17) त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पास्तेला पुन्हा येरवडा कारागृहात नेण्यात आले. तेव्हा कारागृहातील प्रवेशद्वारात रक्षकांनी त्याची झडती घेतली. झडतीत त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस सापडला. त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पास्तेची कारागृहात तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयात त्याला चरस दिल्याचा संशय आहे. पोलीस बंदोबस्तात त्याला चरस मिळाल्याने बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई वळाली आहे.





