पुणे : पीएमपीचे पुण्यात “विस्टाडोम’ बसथांबे!

फक्त लोखंडी सांगाड्यात बसून प्रवाशांना घडणार “आकाशदर्शन’
पुणे – महापालिका आणि पीएमपीने शहरभर कोट्यवधींचा खर्च करत स्टेनलेस स्टीलचे बस थांबे उभारले. मात्र, तेथील फायबर शीट आणि लोखंडी जाळ्या चोरांनी लंपास केल्या. त्यामुळे केवळ स्टेनलेस स्टिलचे सांगाडे शिल्लक राहिले आहेत. याच फाटक्या-तुटक्या बस थांब्यांवर सध्या ऊन आणि भविष्यात पावसाचा सामना प्रवाशांना करावा लागणार आहे. त्यामुळे रेल्वेप्रमाणे “विस्टाडोम’ सेवेचा आनंद प्रवाशांना दिला जातोय का? असा उपरोधिक प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
पीएमपीने प्रत्येक बसथांब्यासाठी सरासरी सात ते दहा लाख रुपये खर्च केला आहे. हे बस थांबे नगरसेवक, आमदार, खासदारांच्या निधीतून उभारले गेले आहेत. याशिवाय काही बसथांबे हे महापालिकेने पीएमपीला दिलेल्या पायाभूत सुविधांच्या निधीतून उभारले गेले आहेत. त्यावर बसचे वेळापत्रक नसले, तरी आमदार, खासदार आणि नगरसेवकांची नावे मात्र दिमाखात झळकत आहेत. मात्र, हे सांगाडे दुरुस्त करण्याची तसदी ना पीएमपी घेत आहे ना महापालिका. त्यामुळे प्रवाशांना मात्र केवळ मनस्तापच सहन करावा लागत आहे.
केवळ लोखंडी सांगाडे
बसथांब्यांच्या सांगाड्यांचा एक-एक भाग दररोज गायब होत आहे. अनेक बसथांब्यांना छप्पर आणि आसनही नाही. काही ठिकाणी केवळ लोखंडी खांब आहेत. गर्दुल्यांनी तर सांगाडेही तोडून विकण्यासाठी नेले आहेत. मात्र, प्रशासनाला त्यांच्याकडे पाहण्यासाठी वेळच नसल्याचे वास्तव आहे.
पावसाळ्यात कसे वापरणार
यातील अनेक बसथांबे हे मोठ्या झाडांखाली होते. त्यामुळे सावलीचा आधार नागरिकांना मिळत होता. मात्र, पावसाळा तोंडावर आला आहे. या थांब्यांना छत नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांनी कशाचा आसरा घ्यायचा, याच्याशी पीएमपीला काही देणे-घेणे नाही. याबाबत प्रवासी तसेच स्वयंसेवी संघटनांनी पीएमपीकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
विस्टाडोम कोच म्हणजे काय?
पर्यटक-प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेने नुकतेच “विस्टाडोम कोच’ सुरू केले आहेत. हे डबे पारदर्शक असतात. त्यामुळे प्रवाशांना निसर्गसौंदर्य अनुभवता येते.





