Pune : पीएमपीकडून दीड हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई; कामात हलगर्जीपणा करणारे रडारवर

पुणे – फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई तर होणारच. त्याचबरोबर बस डेपोसह संचलन मार्गावर प्रवाशांसी गैरवर्तणूक आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पीएमपी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मागील दोन महिन्यांत (मे आणि जून २०२५) जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून ‘चुकीला माफी नाही’, हे दाखवून दिले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनविण्याबरोबरच प्रवाशांना जलदगतीने सेवा देताना पुणे परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणि सौजन्यपणा पाहिजेच. त्याच पार्श्वभूमीवर पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि संचलनात प्रवाशांची गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यानुसार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करणाऱ्याबरोबरच तिकीट तपासणीसांकडून बसला दोन्ही बाजूला बोर्ड लावले का, चालक-वाहक यांचा गणवेश आहे का, बस स्वच्छ आणि प्रवाशांच्या काही तक्रारी नाही ना यांसह आदी तपासणी केली जाते.
त्यामध्ये दोषी चालक-वाहकांचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्यात येतो. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मागील दोन महिन्यांत १ हजार ४७४ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून, ८ लाख ४४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यामध्ये मे महिन्यात सर्वाधिक ७७६ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे जून महिन्यात ही संख्या काहीशी घटल्याचे दिसून येते.

अडीच हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई
पीएमपीच्या तिकीट तपासणीसांकडून मागील दोन महिन्यांत २ हजार ५७८ फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्यावर एकूण १२ लाख ८९ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये शाळा, महाविद्यालय सुरू झाल्यावर या फुकट्या प्रवाशांची संख्या अधिक वाढल्याचे दिसून येते. मे महिन्यात पावणेपाच लाख दंड वसूल केला, तर जून महिन्यात तो दुप्पट म्हणजेच ८ लाख १८ हजार इतका झाला.





