पुणे पीपल्स को-ऑप. बँकेचा १२.५ टक्के लाभांश

Pune : पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि. पुणे या मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह बँकेची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ८ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता दि पुना मर्चेंटस् चेंबर, व्यापार भवन सी-५०, मार्केटयार्ड, पुणे येथील सभागृहात पार पडली. सीए जनार्दन रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम झाला. सदर सभेस बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधुन सहकार खात्यामध्ये लक्षणीय कामगिरी करणारे सेवानिवृत्त अपर आयुक्त व विशेष निबंधक शैलेश कोतमिरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्याबरोबरच बँकेच्या विकासासाठी हातभार लावणारे बँकेचे प्रतिष्ठीत ठेवीदार, ठेवीदार पतसंस्था, अहवाल काळात सामाजिक, शैक्षणीक, उद्योग तसेच क्रीडा इ. क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेले सभासद, खातेदार, त्यांचे पाल्य, सेवक व त्यांचे पाल्य यांचा शाल, श्रीफळ, शैक्षणिक साहित्य, उपयुक्त पुस्तके व फुलझाडाचे रोप देण्यात आले.
तसेच बँकेचे जेष्ठ संचालक अॅड सुभाष मोहिते यांना नुकत्याच मिळालेल्या सहकार रत्न पुरस्काराचे अनुषंगाने बँकेच्या वतीने मोहिते पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार या निमित्ताने करण्यात आला.
यावेळी शैलेश कोतमिरे म्हणाले, “मी सहकारातील एक सच्चा कार्यकर्ता आहे, गेली ३१ वर्षे सहकार क्षेत्रामध्ये निष्ठेने काम केल्याचे व आपल्या सारख्या सहकारातील मान्यवर व हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाचे हे यश आहे असे मी मानतो. सर्वसामान्यांना आर्थिक आधार व स्थैर्य मिळवून देण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका महत्वपूर्ण ठरत आली आहे, महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये सहकाराचे कार्य उल्लेखनीय आहे.”
पुढे ते म्हणाले, “कामकाजातील पारदर्शकता आणि सभासद विश्वासार्हता या दोन स्तंभाच्या मजबूतीवर कोणतीही संस्था लक्षणीय प्रगती करु शकते. पुणे पीपल्स बँकेने सहकार तत्वांचे पालन करुन मिळविलेल्या कौतुकास्पद यशाने हे सिध्द करुन दाखविले आहे. बँकेचे आणि माझे आपुलकीचे ऋणानुबंध आहेत, संचालक मंडळाशी माझा जवळचा स्नेह आहे,” तसेच या सत्काराबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.
पुणे पीपल्स को-ऑप. बँक ही महाराष्ट्र राज्यातील मल्टीस्टेट को-ऑप बँकांमधील एक अग्रगण्य बँक असुन ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा २३७८ कोटीचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ठेवी रु १४७१ कोटी, कर्जे रु. ९०८ कोटीचा समावेश आहे.
बँकेची निव्वळ एन.पी.ए.ची टक्केवारी ०%, सी.डी. रेशो ६१.७०%, निव्वळ नफा रु.१६.२० कोटी असल्याची त्याचबरोबर बँक सभासदांना सातत्याने १२% दराने लाभांश देत असुन मा.संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार अहवाल वर्षासाठी १२.५०% दराने लाभांश जाहीर करण्यात येत असुन लाभांश रक्कम लवकरच संबंधित सभासदांचे खात्यावर जमा होईल अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांनी दिली.
ऑगस्ट, २०२४ अखेर बँकेने प्रथमच गतवर्षीपेक्षा सुमारे ८० कोटी व्यवसाय वाढ साध्य केली असुन मार्च २०२५ अखेर बँक रु ३००० कोटीचा व्यवसाय टप्पा पूर्ण करेल असा विश्वास अध्यक्ष श्री रणदिवे यांनी व्यक्त केला. स्पर्धेच्या काळात टिकून राहणे हे बँकांसमोरील मोठे आव्हान असुन बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी विविध योजनांद्वारे नियोजनबध्द प्रयत्न करीत आहे.
सुरक्षा, पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकहित ही बँकेची त्रिसूत्री असुन २१ शाखा व एका विस्तारीत कक्षासह बँक गेली ७२ वर्षांपासुन यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. आज बँकेकडे UPI, IMPS, Mobile Banking App, Rupay ATM, QR Code, NACH अशा आधुनिक सुविधा कार्यान्वीत आहेत.
झर्व्ह बँकेने नुकतीच बँकेला बारामती व वाळूंज (संभाजीनगर) येथे शाखा उघडण्यास मान्यता दिली आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असुन लवकरच सदर शाखा दिमाखात कार्यरत होतील. याशिवाय युपीआय लाईट, Rupay चे कॉन्टॅक्टलेस ए टी एम कार्ड, डाटा सिक्युरीटीसाठी क्लाऊडबेस प्रणालीचा वापर, स्वतंत्र आय एफ एस सी कोड व थेट सभासदत्व प्राप्त करणे, राज्यातील इतर जिल्हयात
शाखा विस्तार करणे, इंटरनेट बँकिंग सुरु करणे, शेडयुल्ड बँकेचा दर्जा प्राप्त करणे आदी उद्दिष्टे असल्याचे जेष्ठ संचालक अॅड. सुभाष मोहिते यांनी नमूद केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय भोंडवे यांनी सभेचे संचालन केले, प्रास्ताविक व सभासदांनी विचारलेल्या शंकाचे निरसन अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांनी केले. बँकेचे जेष्ठ संचालक अॅड सुभाष मोहिते यांनी सभेस मार्गदर्शन केले व उपस्थितांचे आभार मानले.





