PUNE : महापालिकेचा दंड भरा आता ऑनलाइन; गैरप्रकारांना बसणार आळा

पुणे – महापालिकेकडून प्रतिबंधात्मक कारवाई तसेच वेगवेगळ्या कारणांस्तव पुणेकरांकडून दंड आकारला जातो. तो आता ऑनलाइन भरता येणार आहे. त्यासाठी एका खासगी बॅंकेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत बॅंकेशी करार करणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
पहिल्या टप्प्यात ही सुविधा आरोग्य विभाग, घनकचरा, अतिक्रमण नियंत्रण, आकाशचिन्ह तसेच मंडई विभागाचा दंड वसूल करण्यासाठी असणार आहे. तर परवाना शुल्कही याच प्रणालीद्वारे स्वीकारले जाणार आहे. प्रशासनाकडून दिवसभर वेगवेगळ्या स्वरुपाची कारवाई केली जाते. त्यासाठीचे दंड निश्चित करण्यात आलेले असून ती वसूल करताना रोख रक्कम घेतली जाते. तसेच संबंधित व्यक्तीस छापील पावती दिली जाते. मात्र, अनेकदा अशा प्रकारची बनावट पुस्तके वापरून केवळ कागदी पावती दिली जाते. तर अनेकदा पावती बिलांमध्ये फेरफार करून दंडाची रक्कम भरली जात नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन आता या विभागांकडून दंड ऑनलाइन स्वीकारण्यात येणार आहे.
विभागांची टाळाटाळ
जवळपास दीड महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने याबाबत अंतिम निर्णय घेतला असला, तरी या नियोजनात आरोग्य, मंडई, घनकचरा, अतिक्रमण नियंत्रण आकाशचिन्ह हे विभाग आहेत. त्यामुळे कोणत्या विभागाने बॅंकेशी करार करायचा यावरून वाद सुरू आहेत. हा निर्णय घेतला तेव्हा केवळ मोजक्याच विभागांना बैठकीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, विभाग प्रमुखांनी ही जबाबदारी एकमेकांवर झटकत करारनामा करण्यास दिरंगाई चालवली आहे.





