पुणे – पावसामुळे सलग दोन-तीन दिवसांपासून शहरात येणारे मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पावसाचीही संततधार सुरू आहे. यात रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वारांना पदपथावरून वाहने नेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे महामार्गासह शहरातील तसेच उपनगरांतील रस्त्यांचे पदपथ सध्या टू व्हिलर ट्रॅक बनले आहेत. शहरात येणाऱ्या सर्वच महामार्गांवर खड्डे पडल्याने या रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहने आदळत असल्याने त्यांचा वेग मंदावला आहे. त्यातच अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे या सगळ्या कचाट्यात वाहनांच्या कोंडीसह वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वारांना पदपथाचा आधार घ्यावा लागत आहे. वाहनांच्या रांगा लागल्यानंतर एका बाजुने पदपथावर दुचाकी एकामागे एका ओळीने कोंडीतून मार्ग काढत असताना पदपथांचा मोठा उपयोग होत आहे. सोलापूर महामार्ग, सातारा महामाार्ग. नगर महामार्ग यासह खराडी-मुंंढवा. केशवनगर-मांजरी. हडपसर-सासवड रस्ता. मंतरवाडी ते हांडेवाडी. कोंढवा ते कात्रज, कोथरूड-वारजे, औंध बाणेर अशा रस्त्यांवरील पदपथही दुचाकीस्वारांनी व्यापलेले दिसतात. पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. नियमबह्यच परंतु, पर्यायच नाही… महापालिकेकडून गेल्याच वर्षी (जी-२०) शहरातील पदपथांच्या सुशोभिकरणावर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. पदपथांची उंची वाढविणे, पेव्हंग ब्लाक बसविणे. रंगकाम. पथदिवे यावर मोठा खर्च करण्यात आला. यातून शहराच्या वैभवात भर पडली असली तरी या पदपथांचा खरा उपयोग पावसाळ्यात दुचाकी चालकांना होत आहे. पदपथांवरून वाहने चालविणे नियमबाह्य बसले तरी सध्या होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी हाच एकमेव पर्याय असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात शहरात वाहतूक कोंडी होणे हा नित्य नियम झाला आहे. त्यामळे वाहतूक पोलिसही ही समस्या गंभीरपणे घेत नसल्याचे दिसते. शक्य तेवढे वाहतूक नियमन करताना पोलीस दिसतात, पावसाळ्यात ही यंत्रणाही कोमडल्याचे चित्र सर्वत्र होते.