pune : २३ गावांच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा
Pune:

कागदपत्रे स्कॅनिंगची कामे अंतिम टप्प्यात
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या प्रशासकीय हस्तांतरण प्रक्रियेला आता वेग आला आहे.
संबंधित कागदपत्रांचे स्कॅनिंग आणि डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होताच या गावांशी संबंधित सर्व अभिलेख, मंजूर विकास आराखडे, जमीनविषयक नोंदी, टाउन प्लॅनिंग (टीपी) योजनांची कागदपत्रे, तसेच विविध विकासकामांचा तपशील अधिकृतपणे पुणे महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांतील विकासकामांची जबाबदारी पूर्णपणे महापालिकेकडे येणार असून, नागरिकांना आवश्यक प्रशासकीय सेवा एकाच यंत्रणेमार्फत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या २३ गावांमधील टाउन प्लॅनिंग (टीपी) योजना, रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, आरक्षणांची अंमलबजावणी, विकास परवानग्या, तसेच इतर नागरी विकासाशी संबंधित सर्व कामे पुणे महापालिकेला हाताळावी लागणार आहेत. यामुळे संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून प्रलंबित कामांना गती देण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर उभे राहणार आहे.
या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर नागरिकांकडून मूलभूत सुविधांबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. रस्ते, पाणी, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, उद्याने, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक, पायाभूत सुविधा यांसारख्या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेला नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागणार आहे.
त्याचबरोबर पीएमआरडीएकडून सुरू असलेल्या विकास प्रकल्पांची सातत्याने अंमलबजावणी, टीपी योजनांमधील प्रलंबित बाबींचा निपटारा आणि नव्या विकास प्रस्तावांना गती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय हस्तांतरणाची प्रक्रिया औपचारिकरीत्या पूर्ण होईल आणि त्यानंतर या सर्व गावांच्या विकासाची धुरा पुणे महापालिकेकडे अधिकृतपणे सोपविली जाणार आहे.





