Pune Crime News : पुण्यात मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश; आठ मोबाईल व चोरीची बाईक जप्त
Pune Crime News : पुणे शहरात धुमाकूळ घालणाऱ्या परप्रांतीय मोबाईल चोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Crime News : पुणे शहरात मागील आठ ते दहा दिवसांपासून रस्त्यावर मोबाईलवर बोलत चालणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढल्या होत्या. स्पोर्ट्स बाईकवर भरधाव वेगात येऊन क्षणार्धात मोबाईल हिसकावून आरोपी पसार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर पर्वती पोलिसांनी सखोल तपास करत चार जणांच्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन आणि चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
अर्जुन कमलेश सरोज (वय १८, रा. आंबेगाव पठार, मूळ प्रयागराज, उत्तर प्रदेश), इमरान शफीक शेख (वय १८, रा. उंड्री चौक, मूळ साहेबगंज, झारखंड), रवीकुमार राजेंद्रकुमार ( २१, रा. उंड्री चौक, मूळ प्रयागराज, उत्तर प्रदेश) आणि प्रदीपकुमार महेंद्रकुमार (वय २१, रा. आंबेगाव पठार, मूळ रायबरेली, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. या प्रकरणात पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हिसकावण्याचे दोन गुन्हे दाखल झाले होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस हवालदार प्रकाश मरगजे यांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींची मोटारसायकल दिसून आली. तसेच त्या गाडीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रिपल सीट प्रवासाबद्दल वाहतूक चलनही कापण्यात आले होते.
या धाग्यांवरून पोलिसांनी गाडीचा माग काढत उंड्री चौक गाठला आणि तेथून मुख्य आरोपी इमरानसह तीघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत समजले की, इमरान शेख हा सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतून एक नवी दुचाकी चोरी करून पुण्यात आला होता.
तो उंड्री येथे त्याचा मित्र रवीकुमार याच्यासोबत मजुरीचे काम करत राहत होता. इतर तीन आरोपी भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते. रवीकुमारच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. इमरानने दोन मोबाईल हिसकावल्याचे उघड झाले असून दोन्ही वेळा त्याने ट्रिपल सीट येऊन चोरी केली होती. प्रत्येक वेळी त्याने सोबतचा एक पार्टनर बदलला होता.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, हवालदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक तसेच पोलीस कर्मचारी सुर्या जाधव, मनोज बनसोड, नानासो खाडे, सद्दाम शेख, अमित चिव्हे, अमोल दबडे, राकेश सुर्वे आणि पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी सहभाग घेतला.





