पर्यावरण विभाग उपआयुक्तांचा बैठकीत इशारा पुणे – हरित इंधनाचा वापर न करणाऱ्या बेकऱ्या, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिला आहे. उपआयुक्त (पर्यावरण) रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बेकरी असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत स्वच्छ व हरित इंधनाचा वापर करून शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली. हवा (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ च्या कलम ३१(अ) अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) बेकरी, हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल आणि ढाबा यामध्ये लाकूड, कोळसा किंवा तंदूरऐवजी एलपीजी, पीएनजी, वीज आणि इतर हरित उर्जेच्या स्रोतांचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार, महापालिकेकडून शहरात या नियमांची अंमलबाजावणी सुरू केली असून संबंधितांना या नियमांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीत बेकरी असोसिएशनतर्फे माहिती देण्यात आली की, पुणे शहरात सुमारे ७५० बेकऱ्या कार्यरत असून उपनगरांमध्ये आणखी २०० ते २५० बेकऱ्या आहेत. त्यांपैकी बहुतेकांनी स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केला आहे, तर काही बेकऱ्या रूपांतरणाच्या प्रक्रियेत आहेत. या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत असोसिएशनने उपआयुक्तांसमोर मुद्दे मांडले आणि यासाठी पालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी केली. तर, शहरातील वाढते हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि बेकरी असोसिएशन एकत्रितपणे प्रयत्न करतील तसेच प्रदूषण नियंत्रणाबाबत मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही पालिकेच्या वतीने या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. महापालिकेकडून शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पातळयांवर उपाय योजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत पहिल्यांदाच ही बैठक बोलविण्यात आली होती. संघटनेची बाजू समजून घेण्यात आली असून दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जाणार आहेत. – रवी पवार, उपायुक्त, पर्यावरण विभाग