Pune | मालवाहतूक वाहनांची आता ऑनलाइन नोंदणी; वाहन विक्रेत्यांनाच अधिकार

पुणे – पूर्ण बांधणी केलेल्या तीन चाकी मालवाहतूक आणि सात टनांपेक्षा कमी असलेल्या मालवाहतूक वाहनांची आता ऑनलाइन नोंदणी करता येणार. या वाहनांच्या नोंदणीचे अधिकार अधिकृत वाहन विक्रेत्यांना देण्यात आले असून, त्याबाबतचे परिपत्रक नुकतेच परिवहन विभागाने काढले.
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या तरतुदीनुसार वाहनांच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय सुचना केंद्र (एनआयसी) यांनी “वाहन ४.०’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत दुचाकी आणि कार या वाहनांची नोंदणी ऑनलाइन होत होती. मात्र, प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयातच होत होती. त्यामुळे वाहन विक्रेत्यांचा, चालकांचा वेळ जात होता. परिवहन विभागाकडून जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कंपनीने बांधणी केलेली वाहनांची नोंदणी ऑनलाइन करण्याची मागणी होत होती.
त्यानुसार आता परिवहन विभागाने टुरीस्ट टॅक्सी (मीटर्ड टॅक्सी वगळून), कंपनीने पूर्ण बांधणी केलेल्या तीन चाकी मालवाहतूक आणि ७ हजार ५०० किलाेंपेक्षा कमी सकल भार क्षमता असलेल्या कंपनीने पूर्ण बांधणी केलेल्या मालवाहतूक वाहनांची ऑनलाइन नोंदणी करण्याचा अधिकार अधिकृत वाहन विक्रेत्यांना दिला आहे. मात्र पूर्ण बांधणी नसलेल्या आणि प्रवासी वाहतूक वाहनांची नोंदणी मात्र आरटीओ कार्यालयातच होणार आहे, असेही या आदेशात म्हटले आहे.





