Pune: पुण्यात कोणाच्या डोक्यावर मंत्रिपदाचा मुकुट?

पुणे – विधानसभा निवडणुकीत महायुतीला कल्पनेच्या बाहेर बहुमत मिळाले आहे. त्यामुळे अनेक सिनियर आमदारांना आता मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. आपल्याला एकतरी खाते मिळणारच अशी खात्री अनेकांना वाटत आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवातही केली आहे.
पुणे जिल्ह्याने महायुतीला २१ पैकी १८ आमदार देऊन मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये महायुतीचे १८ आमदार, तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आणि १ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रीपदाबाबत पूर्ण न्याय पक्षश्रेष्ठींना द्यावाच लागणार आहे.
पुणे शहरात निवडून आलेल्या महायुतीच्या सात आमदारांपैकी चंद्रकांत पाटील हे आधीच मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मंत्रीपद येणार आहेच. त्यानंतर माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर हे सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यातील मिसाळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
जिल्ह्याचा विचार करता बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार, आंबेगावमधून निवडून आलेले दिलीप वळसे-पाटील यांचे मंत्रीपद तर फिक्स आहेच. दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके, पुरंदरेचे विजय शिवतारे हे देखील मंत्रीपदाचे दावेदार आहेत. शेळके यांनी मतांचा विक्रम करत लाखाच्या पुढे लीड मिळवले आहे. याशिवाय भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनाही मंत्रीपद मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यमंत्रीपदासाठी त्यांचा विचार होऊ शकतो.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील हे सलग आठव्यांदा निवडून आले आहेत. केवळ त्यांच्याकडे आता कोणती खाती येतील हे पाहणे औत्सुक्याचे आहे. त्यामुळे पुण्याच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपदाशिवाय कोणती खाती असतील हे देखील पहावे लागेल.





