पुणे: ‘म्हाडा’च्या इमारत पुनर्विकासातील अडथळे हटणार

पुणे – महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’चे पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी ४०० थकीत मुद्रांक शुल्क म्हाडा ची प्रकरणे मार्गी लावली. त्यामुळे अभिहस्तांतरणाचा मार्ग मोकळा होऊन प्रभाग दोन मधील म्हाडाच्या इमारत पुर्नविकासातील अडथळे हटणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’ राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अभियानाचे पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील हिंदू संस्कृती संवर्धन मंच येथे डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने आयोजन केले होते.
या वेळी म्हाडाचे प्रवीण वाघमारे, गोडे साहेब, ॲड. सराफ, ॲड. प्रदीप पाटील, मुद्रांक शुल्क विभागाचे प्रशासकीय अधिकारी मंगेश खामकर, संतोष हिंगणे आदींसह ३२ जणांची समिती या उपक्रमासाठी सहभागी झाले होते. या बरोबरच प्रभागातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती चे अजय बल्लाळ , संयुक्त संघ चे डि के जाधव , नामदेव वेताळ, समतानगर गाळेधारक महासंघाचे सचिव शिवाजीराव ठोंबरे , हिंदु संस्कृती चे दिलिप महस्के , प्रेरणा जेष्ठ नागरिक संघ चे सांडभोर , दिघे , मेजर रणपिसे , त्रिरत्न संघ चे रत्नदिप हिरवे , पथारी संघटने चे विजय कांबळे , गजानन जागडे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील म्हाडाच्या इमारत पुनर्विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याला आणखीन गती मिळण्यासाठी शासनाची महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’ प्रभागात राबविण्यात आली. इमारतीचे अभिहस्तांतरण करणे हे म्हाडाच्या इमारत पुनर्विकासातील महत्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक गाळेधारकांनी थकीत मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’ राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
१ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडामध्ये या अभय योजनेत सवलत देण्यात आलेली आहे. ही योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.





