पुणे : हडपसरमध्ये दहशत माजवणारा गुंड रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण व टोळीविरोधात काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.स्थावर मालमत्ता, वाहने, बँक खाती आणि घरगुती वस्तूवर कारवाई करताना लाखोंची मालमत्ता जप्त केली आहे. काळेपडळ ठाण्याने टिपू पठाण, रा. सय्यदनगर, हडपसर याच्याविरोधात मोक्का कारवाई केली. त्याची इनोव्हा जप्त केली असून, ही गाडी ३० एप्रिलपासून वाघोलीतील सर्व्हिसिंगसाठी ठेवली होती. त्याचप्रमाणे सय्यदनगर परिसरातील अनधिकृत कार्यालयावर महापालिका, पोलिसांनी बुलडोझर फिरवला. टिपू आणि साथीदारांची बँक खाती गोठवली (फ्रिज केली) असून, त्यातील आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे. झडती दरम्यान, फॅन, एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, फर्निचर आदी अंदाजे चार ते पाच लाख किमतीच्या घरगुती वस्तू जप्त केल्या. या वस्तूंचे मूल्यांकन व्हॅल्यूअरकडून करून घेतले जात आहे. संबंधित वस्तूंच्या बिलांची मागणी केल्यावर ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.तसेच, झडतीदरम्यान दोन साठेखत (नोटरी केलेली कागदपत्रे) मिळाली असून, पुढील कारवाई सुरू आहे. सादिक कपूर, एजाज सत्तार पठाण, रिझवान ऊर्फ टिपू पठाण, मेहबुब अब्दुल गफ्फार शेख, जावेद गणी शेख, मुनीर अब्दुल शेख व साथीदारांनी मौजे हडपसर येथील स. नं. ७४, हि. नं. १४/६ (क्षेत्रफळ ०० हे. ११ आर) या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करून ताबा घेतला होता. जागेवरील कंपाउंडचे नुकसान करून बेकायदेशीर बांधकाम केले. ते तिसऱ्याला वापरासाठी देवून मोठी रक्कम घेतली. ही कारवाई उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळगे यांच्या सूचनेनुसार केली. मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांनी भाग घेतला.