पुणे : कोयता गॅंग नव्हे, तर ते होते सफाई कर्मचारी

दुचाकीवर कोयता घेऊन जाणे पडले महागात
पुणे – झुडूप काढण्यासाठी दुचाकीवरून कोयता नेणे मनपा सफाई सेवकांना चांगलेच महागात पडले आहे. हे दोन कर्मचारी सीसीटीव्हीत कैद झाले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी त्यांना शोधत चौकशी सुरू केली. काही वेळातच आरोग्य निरीक्षकांनी माहिती दिल्यावर या कर्मचाऱ्यांना अलंकार पोलिसांनी सोडून दिले. मात्र, कोयता गॅंगची दहशत संपवण्यासाठी पोलिसांचे सूक्ष्म पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी मनपा कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक वैजीनाथ गायकवाड यांना फोन केला. यात त्यांनी डहाणूकर कॉलनी रस्ता क्रमांक 18 वरील स्व. रामदासजी कळसकर नामफलकासमोर झुडपे वाढल्याची तक्रार केली. गायकवाड यांनी दोन सफाई सेवकांना ही झाडे काढण्याच्या सूचना केल्या.
हे कर्मचारी कोयता घेऊन निघाले. ही दुचाकी सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर पोलीस मुख्यालयाने हा व्हिडिओ अलंकार पोलिसांना पाठवला. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना गाठत ठाण्यात आणून चौकशी सुरू केली. यानंतर बाळासाहेब दांडेकर व वैजीनाथ गायकवाड यांनी पोलिसांनी भेटत हे महापालिकेचे सफाई कर्मचारी असल्याचे सांगितले.
हत्यारांची माहिती द्यावी
मनपा सफाई कामगारांकडील हत्यारांची माहिती पोलिसांना फोटोसह द्यावी, अशा सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण व आशीष राठोड यांनी महापालिकेस केल्या आहेत. “कोयते, कुऱ्हाडी, गवत काढण्यासाठी वापरात असलेल्या तलवारी झाकून न्यावीत. हत्याराने केलेल्या कामाची नोंद व छायाचित्रे काढून ठेवावीत. कामगारांनी आपला गणवेश व ओळखपत्र परिधान करावे अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या.




