Pune News : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण सोडत आज ; राजकीय समीकरणे बदलणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यपदांसाठी आणि तेरा पंचायत समित्यांच्या सदस्यपदांसाठीची आरक्षण सोडत उद्या, म्हणजेच सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात दुपारी १२ वाजता काढली जाईल. पंचायत समित्यांची आरक्षण सोडत संबंधित तालुका मुख्यालयांमध्ये काढली जाईल. या सोडतीमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार असून इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ आणि संबंधित आरक्षण नियम २०२५ नुसार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच या सर्व प्रवर्गांमधील महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा निश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली.
या आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार असून, राजकीय पक्ष आणि इच्छुकांना त्यानुसार आपली रणनीती आखता येणार आहे. प्रशासनाने यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असून, यंत्रणा सज्ज झाली आहे.
पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचे ठिकाण :
– हवेली: उद्यान प्रसाद कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे
– शिरूर: नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, शिरूर
– मावळ: भेगडे लॉन्स, वडगांव मावळ
– दौंड: नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, दौंड
– भोर: अभिजीत मंगल कार्यालय, भोर
– बारामती: कवी मोरोपंत सभागृह, बारामती
– इंदापूर: राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर
– जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, वेल्हे, पुरंदर: संबंधित पंचायत समिती कार्यालय सभागृह




