Pune News : ‘रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यावर भर देणार’ – मुरलीधर मोहोळ

पुणे – व्यापार, उद्योग, क्रीडा, शिक्षण, संशोधन क्षेत्रांसह आयटी कंपन्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या पुणे शहरात राज्यातून, तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक पुण्यात येतात.
त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसह सर्वच क्षेत्रांना प्रवासाची सर्वांत स्वस्त असलेली रेल्वेची सेवा पुण्यात आणखी विस्तारण्यावर आपला भर राहणार असल्याची ग्वाही महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
त्यासाठी आगामी २० वर्षांचा विचार करून पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असल्याने पुण्याची अन्य शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल, असा विश्वासही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार संजय काकडे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, प्रकाश ढोरे, दत्ता खाडे, परशुराम वाडेकर, मुकेश गवळी, आनंद छाजेड, कार्तिकी हिवरकर, दुर्योधन भातकर, विजय वेल्हेकर, हर्षद बोडके, प्रवीण गायकवाड, धर्मेश शहा, नितिन शिंदे, डॉ. अजय दुधाणे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, शहरातील पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी आणि हडपसर स्थानकांचा गेल्या दहा वर्षांत प्रवासीकेंद्रित विकास करण्यात आला आहे. त्यातील पुणे स्थानकावरून दररोज ७२ रेल्वे गाड्या सुटतात व लोकलच्या ४१ फेऱ्या होतात. दररोजची प्रवासी संख्या दीड लाख इतकी आहे.
७५० मीटर लांबीचे नवीन चार आणि लोकलसाठी ६०० मीटर लांबीचे नवीन दोन फलाट बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याहून ३०० रेल्वे धावतील आणि दररोजची प्रवासी संख्या तीन लाख इतकी होऊ शकेल. परिणामी रेल्वे स्थानकांवर येणारा भार कमी होण्यासही मदत होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
केंद्राकडे पाठपुरावा करणार
मोदी सरकारने पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश देशातील सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गावरचे प्रमुख स्थानक म्हणून केला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानक तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेने जोडले जाईल. सध्या पुणे ते वाडीदरम्यानचा सर्व्हे सुरू असून,
पुणे ते लोणावळादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी आपण केंद्राकडे पुण्याचा प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही या वेळी मोहोळ यांनी दिले.





