प्रभात वृत्तसेवा पुणे – स्वारगेट येथील जेधे चौकातील व्हेगा सेंटरकडून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग दोन दिवसांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव हा मार्ग १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून २२ सप्टेंबर रोजी पहाटे ७ वाजेपर्यंत बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या प्रकल्प विभागाने केले आहे.भुयारी मार्गातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बसवलेले लोखंडी चॅनल तुटले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नीट वाहून जात नाही आणि साचून राहात आहे. यामुळे वाहनचालकांना अडचणी निर्माण होत होत्या. शिवाय तुटलेल्या चॅनलमुळे मोठा आवाजही होत होता. या कारणांमुळे नागरिक आणि स्थानिकांनी वारंवार तक्रारी करून मागणी केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेकडे या दुरुस्तीबाबत पाठपुरावा सुरू होता. मात्र, पावसाळ्यात मोठे काम करणे कठीण असल्याने, तसेच व्हीआयपी दौरे आणि गणेश कला क्रीडा मंचाच्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामुळे पोलिसांकडून हा मार्ग बंद ठेवण्यासाठी वेळ दिला जात नव्हता. या दोन दिवसांत हे लोखंडी चॅनल बदलून नवीन चॅनल बसविण्यात येणार असून, ड्रेनेज लाइनची स्वच्छता आणि मजबुतीकरणाचे कामही करण्यात येणार आहे.. त्यामुळे भविष्यात पावसाचे पाणी साचणार नाही आणि वाहनधारकांना त्रास होणार नसल्याचे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जेधे चौक परिसर हा वाहतूक दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या कालावधीत वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी वेळेआधी नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही आवाहनही त्यांनी केले आहे.