Pune News : काळ्या काचांच्या टेम्पोचा थरारक पाठलाग; १७ वर्षीय चालक ताब्यात, तीन-चार वाहनांना घासले
काळ्या काचा लावलेल्या वाहनांविरोधातील विशेष कारवाईदरम्यान पोलिसांना न जुमानता भरधाव वेगाने टेम्पो पळविणाऱ्या १७ वर्षीय चालकाचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून अखेर १५ नंबर चौकात ताब्यात घेतले.

Pune News : काळ्या काचा लावलेल्या वाहनांविरोधातील विशेष कारवाईदरम्यान पोलिसांना न जुमानता भरधाव वेगाने टेम्पो पळविणाऱ्या १७ वर्षीय चालकाचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून अखेर १५ नंबर चौकात ताब्यात घेतले.
पाठलागादरम्यान टेम्पोने तीन ते चार वाहनांना घासाघीस केल्याने किरकोळ नुकसान झाले. चालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनांविरोधात विशेष मोहीम सुरू होती. त्यावेळी वानवडी विभागाच्या पथकाने काळ्या काचा असलेला टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने टेम्पो पळविला.
याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेच्या पथकाने वैदूवाडी येथे टेम्पो अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पुढे जात पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. या पाठलागादरम्यान टेम्पोने तीन ते चार वाहनांना घासले. त्यामुळे संबंधित वाहनांचे किरकोळ नुकसान झाले.
अखेर पोलिसांनी टेम्पो अडविल्यानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून चालकाला ताब्यात घेत हडपसर पोलिस ठाण्यात नेले. नुकसान किरकोळ असल्याने संबंधित वाहनचालक तेथून निघून गेले.
चौकशीत हा अल्पवयीन चालक चौफुला, केडगाव येथील असल्याचे समोर आले आहे. हडपसर पोलिसांनी चालक व वाहन पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चालक अल्पवयीन असल्याने वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





