Pune News : जमीन मोजणीचा ताण कमी होणार! पुणे भूमिअभिलेख कार्यालयाचे ‘विभाजन’; आता ‘या’ ठिकाणीही होणार भूमापन
Pune News : एकाच कार्यालयावरील भार हलका करण्यासाठी पुणे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचे दोन भागात विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune News – महसूल विभाग मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. मागील आठवड्यातच पुणे जिल्ह्यासाठी बारामती येथे आणखी एक अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता पुणे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचेही विभाजन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील मोजणी प्रकरणे, जमिनींचे मोजणी प्रकरणांवरील दावे लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे.
त्याचबरोबर विविध प्रकल्प गतीने मार्गी लागणार आहेत. पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण सुरू आहे. विविध प्रकल्पांमुळे जमिनींना आलेले सोन्याचे भाव, जमिनीबाबत असलेले हद्दीचे वाद यामुळे जमीन मोजणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भूमिअभिलेख विभागाकडून जमिनीची हद्द कायम, पोटहिस्सा, बिनशेती, कोर्टवाटप व कोर्टकमिशन व विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जाते.
एकाच अधीक्षक कार्यालयावर संपूर्ण जिल्ह्याचा भार असल्यामुळे कामात विलंब होत होता. त्याची दखल घेत हे पाऊल उचलण्यात आले आहे. या कार्यालयासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यासही मान्यता मिळाली आहे. त्यानुसार या कार्यालयात जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख हे एक पद, कार्यालय नियोजनासाठी उपअधीक्षक, भूकरमापक, शिरस्तेदार, वरिष्ठ लेखापाल आदी पदांही मान्यता दिली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याच्या महसूल प्रशासनात मोठी सुधारणा अपेक्षित आहे. लवकरच नवीन कार्यालयाची जागा आणि नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणखी दोन नगर भूमापन कार्यालये
जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या विभाजनाबरोबरच नगर भूमापन कार्यालय क्रमांक 3 आणि क्रमांक 4 अशी आणखी दोन नगर भूमापन कार्यालय स्थापन करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत पुणे शहरात नगर भूमापन कार्यालय क्रमांक 1 आणि 2 अशी एकूण दोन कार्यालये आहेत.





