Pune News : “आम्हाला ओबीसीतून बाहेर काढा!” स्वतंत्र आरक्षणासाठी भटक्या-विमुक्तांचा महामोर्चा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भटक्या-विमुक्त आदिवासींना ओबीसी प्रवर्गातून वगळून स्वतंत्र व घटनात्मक राजकीय आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी एन. टी.-डी.एन. टी. फेडरेशन तथा विशेष मुक्त आदिवासी फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी पुण्यात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ४२ भटक्या विमुक्त जाती प्रजातीचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपराकार पद्मश्री लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
संघटनेच्या वतीने या मागणीसाठी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत याबाबत निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सध्याच्या ओबीसी आरक्षणात या समाजाच्या हक्कांची लूट होत असून, भटक्या-विमुक्त प्रवर्गासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून त्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा विशेष कायदा करावा, तसेच ज्या जागांवर हे समाजबांधव वर्षानुवर्षे राहतात, ती घरे व जमिनी त्यांच्या नावावर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे या मागण्या मान्य झाल्यास भटक्या-विमुक्त आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व राजकीय हक्कांचे रक्षण होईल. असा दावाही या वेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आला.





