Pune News : पुण्यात संशयित बॅगेने खळबळ; बॉम्बशोधक पथकाची तपासणी
बॅगेची तपासणी सुरू असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारी म्हणून पोलिसांनी चौकातील परिसर मोकळा केला.

Pune News : कॅम्प परिसरातील १५ ऑगस्ट चौकात एका बँकेबाहेर बेवारस बॅग आढळल्याने शुक्रवारी दुपारी खळबळ उडाली. बॅगेत संशयास्पद वस्तू असण्याची शक्यता व्यक्त झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसर रिकामा केला.
बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करून बॅगेची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आढळली नाही. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे ई-मेल येत आहेत. त्यातच शुक्रवारी दुपारी १५ ऑगस्ट चौकातील बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँकेबाहेर एक बेवारस बॅग आढळून आली. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.
बॅगेची तपासणी सुरू असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारी म्हणून पोलिसांनी चौकातील परिसर मोकळा केला. तसेच नागरिकांची वर्दळ रोखून बॅगेची तपासणी केली.
बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली असता बॅगेमध्ये कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आढळली नाही. त्यामुळे बॅगेबाबत निर्माण झालेली भीती दूर झाली. तपासणीनंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.






