Pune News | वाहतूक कोंडीवर उपाय ; सातारा रस्ता ते सिंहगड रस्ता.. थेट बोगद्यातून, फक्त १० मिनिटांत

प्रभात वृत्तसेवा
पुणे : वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने प्रस्तावित बोगद्यांच्या कामांना गती देण्याची हालचाल सुरू केली आहे. तळजाई-पाचगाव आणि सुतारदरा-पंचवटी या दोन बोगद्यांच्या उभारणीला पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जात असून, माती परीक्षणासह प्राथमिक पाहण्या पूर्ण झाल्या आहेत. पालिकेच्या १९८७ च्या विकास आराखड्यात चार बोगद्यांचा समावेश होता.
हे बोगदे २०१७ च्या विकास आराखडयातही कायम असून त्यातील तळजाई-पाचगाव (हिंगणे ते विणकर सभागृह, सातारा रस्ता), राजाराम चौक (सहकारनगर ते सिंहगड रस्ता), सुतारदरा-पंचवटी आणि पंचवटी ते सेनापती बापट रस्ता या बोगद्यांचा समावेश आहे. यापैकी तळजाई-पाचगाव आणि सुतारदरा-पंचवटी हे दोन बोगदे करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार पालिकेने शहरातील प्रस्तावित बोगद्यांच्या कामांना गती देण्यास सुरुवात केली आहे.
वेळेची बचत..
प्रशासनाच्या माहितीनुसार तळजाई-पाचगाव बोगद्यामुळे सातारा रस्ता आणि सिंहगड रस्ता थेट जोडले जाणार आहेत. सध्या या मार्गावर ९ ते १० चौक ओलांडत ४० ते ५० मिनिटांचा कालावधी लागतो. बोगदा तयार झाल्यानंतर हे अंतर अवघ्या अडीच किलोमीटरवर येणार असून ते फक्त १० मिनिटांत पार करता येणार आहे.
सुतारदरा-पंचवटी बोगदा दीड किलोमीटर लांबीचा असून कोथरूड-सुतारदरा परिसरातून पाषाण-पंचवटी येथे पोहोचण्यासाठी सध्या लागणारे ४० ते ६० मिनिटांचे अंतर फक्त ५ ते १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.या बोगद्यांमुळे वेळ, इंधनाची बचत होणार असून वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.





