Pune News : नांदेड सिटी पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई; केवळ २ तासांत खून उघडकीस

पुणे – नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी अवघ्या दोन तासांत खून प्रकरणाचा छडा लावत संशयित आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे प्रत्यंतर आले.
घटना अशी घडली की, पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, प्रभात प्रेस रोडवरील साई धाम परिसरात एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आहे. माहितीची शहानिशा करण्यासाठी ते तात्काळ घटनास्थळी गेले असता, देवा उर्फ देविदास पालते ( २५) हा रक्ताच्या थारोळ्यात सापडला.
सदर माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमीस तात्काळ ससून रुग्णालयात रवाना केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी तपास चक्रे फिरवताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयित गजानन हरिश्चंद्र राठोड ( ३२, रा. यवतमाळ) व महारुद्र शिवाजी गवते ( २७, रा. धायरी, पुणे). याना. चौकशीत त्यांनी कबुली दिली की, मृत देवा याने गजानन राठोडचा मोबाईल परवानगीशिवाय घेतल्याने त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादातूनच मारहाण झाली होती.
या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी केली.





