Pune News : सिकंदर शेख ठरला मार्केट यार्ड ‘मल्लसम्राट’; इराणच्या रेझा आराजेचा केला पराभव

पुणे – श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड (Market Yard) गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित मातीवरील कुस्ती स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख (Sikander Sheikh) याने इराणच्या पैलवान रेझा आराजे याला सोळी हा डाव टाकून अस्मान दाखवत मार्केट यार्ड मल्लसम्राटाचा (Mallasamrat) किताब आपल्या नावे केला.
यावेळी, शेख यास सोपानराव घुले यांच्या स्मरणार्थ गणेश घुले यांनी चार लाख रुपये रोख व कमलाकर गव्हाणे यांच्या स्मरणार्थ प्रसाद कमलाकर गव्हाणे यांनी चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
दुसऱ्या लढतीत हनुमान आखाड्याच्या मारुती कोकाटे याने बाजी मारली. त्याने हरियाणाच्या रविंद्र कुमार याचा एक चाक हा डाव टाकून पराभव केला. त्यास पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या हस्ते तीन लाखांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
याखेरीज, आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पैलवान महेंद्र गायकवाड व हरियाणाचा पैलवान सुनिल कुमार या दोघांमध्ये झालेल्या लढतीत पैलवान महेंद्र गायकवाड याने एक चाक डाव टाकून बाजी मारली. त्याला अरूण भोसले व शिवलाल भोसले यांच्या स्मरणार्थ संचालक अनिरुध्द भोसले यांनी तीन लाखांचे रोख बक्षीस दिले.
गुलटेकडी मार्केट यार्डातील शारदा गजानन मंदिरासमोर पार पडलेल्या सामन्यादरम्यान एकूण 45 निकाली कुस्त्या झाल्या. संपूर्ण स्पर्धे मध्ये महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सलामीच्या कुस्त्यां मध्ये महिला कुस्ती पण ठेवण्यात आली होती.
ज्ञानेश्वरी पायगुडे सह्याद्री क्रीडा संकुल वारजे आणि पौर्णिमा खरमाटे उस्मानाबाद यांची सुद्धा लढत झाली ज्ञानेश्वरी पायगुडे हिने शिताफीने चितपट करत विजय मिळविला. स्पर्धेसाठी ,जेष्ठ पैलवान नरहरी चोरगे, शिवराम तालमीच्या वस्ताद तसेच महाराष्ट्र केसरी हिंद केसरी चे विजेते पैलवान अभिजित कटके, हनुमान आखाडा पुणे चे पैलवान गणेश दांगट,
मामासाहेब मोहोळ तालमीच्या वस्ताद पैलवान पंकज हरपुडे, पैलवान नवनाथ भाऊ घुले, पुण्याचे डी वाय एस पी. तसेच ज्यांनी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब आपल्या नावावर नोंदविला आहे असे विजय चौधरी आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन शारदा गजानन मंडळाचे गणेश घुले, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड गणेश उत्सव मंडळाचे सागर भोसले आणि प्रसाद गव्हाणे यांनी केले.





