Pune News : वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघांनी डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने हा अर्ज मंजुर केला.

Pune News : माहेरकडून पैसे मिळावेत, यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करून विवाहितेचा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात वेळेत म्हणजे ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या प्रकरणात अटकेत असलेले पती, सासु, सासरे आणि दिराला डिफॉल्ट जामीन मंजुर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल मराठे यांनी हा आदेश दिला आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा, ॲड. राहुल भरेकर आणि ॲड. योगिराज स्वामी यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे या घटनेनंतर सर्वत्र खळबड उडाली होती.
दस्तुरखुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नातेवाईकांनी जलद गतीने तपास करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा इथे दिसून येत आहे.
शिल्पा सचिन गवारे यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले पती सचिन उत्तम गवारे (वय ४२), सासु संजीवनी (वय ५७), सासरे उत्तम शिवराम गवारे (वय ६८) आणि दीर संदीप (वय ४०) अशी डिफॉल्ट जामीन झालेल्या चौघांची नावे आहेत.
शिल्पा यांच्या भावाने याबाबत वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. सन २००९ ते आत्महत्या केलेल्या दिवशी म्हणजे २७ अॉगस्ट २०२६ या कालावधीत ही घटना घडली.
माहेरहून पैसे मिळावेत, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मिळावा, तसेच सांगुनही माहेरच्या संपत्तीच्या कागदपत्रांवर सह्या केल्याचा राग धरून शारीरिक आणि मानसिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघांनी डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने हा अर्ज मंजुर केला.





