Pune News : जिल्हा काँग्रेसमध्ये फेरबदल ; जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्रीरंग चव्हाण पाटील यांची निवड

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्रीरंग चव्हाण पाटील यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे आदेश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चैनिथला आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिले.नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीरंग चव्हाण पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
त्या वेळी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष देवीदास भन्साळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ऍड. अभय छाजेड, नेते बाबू नायर, प्रदेश काँग्रेस नियुक्त निरीक्षक, तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी आणि तरुणांच्या सहकार्याने भरारी घेण्याच्या निर्धाराने चव्हाण पाटील यांनी कार्यभार स्वीकारला. प्रास्ताविक काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंदराव मिरघे, तर आभार ऍड आकाश मोरे यांनी मानले.




