प्रभात वृत्तसेवा पुणे – दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाल्या. परिणामी रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी कमी झाल्यामुळे मध्य रेल्वे बोर्डाकडून १५ नोव्हेंबरपासून काही विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये नागपूर, कोल्हापूर, अमरावती आणि लातूर या शहरांचा समावेश असून, जवळपास ७६ फेऱ्या रद्द केल्या आहेत.दिवाळी आणि छठपूजेसाठी पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून यावर्षी एक हजारपेक्षा अधिक जादा रेल्वे गाड्यांचा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने १२ ऑक्टोबरपासून नियोजन करण्यात आले. दिवाळीच्या आठ दिवस आधी आणि दिवाळीनंतर आठ ते दहा दिवस रेल्वे गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये साडेचारशे फेऱ्यांमधून सात लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, दिवाळी संपली. ३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या. त्यामुळे पुढील काही दिवसांत गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी होताना दिसून येत आहे. काही गाड्या ६० ते ७० टक्के भरल्याचे दिसून आले. गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत असल्यामुळे रेल्वे बोर्डाने पुणे आणि मुंबई विभागातील काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.त्यामध्ये हडपसर-लातूर- हडपसर या गाडीच्या १७ ते २५ नोब्हेंबर दरम्यानच्या १६ फेऱ्या रद्द केल्या आहेत. नागपूर-हडपसर-नागपूरच्या सहा फेऱ्या कोल्हापूर-सीएसएमटी-कोल्हापूर गाडीच्या चार फेऱ्या, लातूर-हडपसर-लातूर गाडीच्या १६ फेऱ्या, पुणे-अमरावती-पुणेच्या चार फेऱ्या, तर कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर गाडीच्या २४ फेऱ्या यासह अन्य रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.