Pune News : ‘वाघोली मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न विधानसभेत मांडला’; आमदार कटके यांच्याकडे ग्रामस्थांचा पाठपुरावा

वाघोली – शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊली कटके यांनी वाघोली मधील सतत होणारी वाहतूक कोंडी याबाबत चे प्रश्न विधानसभेत मांडून वाघोली मधील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याबाबतची मागणी केली आहे.
वाघोली मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून यापूर्वी देखील तत्कालीन आमदार अशोक पवार यांनी वाहतूक कोंडीबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडले होते याबाबत शासन स्तरावर बैठका देखील झाल्या होत्या. परंतु वाहनांची संख्या आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार करता वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत असल्याने हा प्रश्न अधिक गंभीर होऊ लागला आहे.
वाहतूक नियंत्रण समितीचे प्रमुख संपत गाडे यांनी बाह्यवळण तसेच विविध विभागांच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजना आदीबाबत पोलीस अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेऊन वाघोलीच्या वाहतुकीच्या कोंडीबाबत प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. अतिरिक्त आयुक्तांनी देखील सर्व विभागांची संयुक्तिक बैठक घेऊन हा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.
याशिवाय वाघोली मधील ग्रामस्थांच्या वतीने संपत गाडे यांनी वाघोली मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा याबाबत ची निवेदन कटके यांना दिले होते. विधानसभेत प्रथमच शिरूर हवेली मधील बिबट्यांच्या वावराने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल तसेच पुणे नगर रोड, पुणे सोलापूर रोड या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीबाबत कटके यांनी विधानसभेत प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.





