Pune News : खासगी टँकरना सवलतीच्या दरात पाणी द्या.! नगरसेवकांची महापालिकेकडे मागणी
शहरातील काही भागांमध्ये अद्यापही पूर्ण दाबाने व क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक परिसरांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Pune News : शहरात सुरू असलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठयामुळे पाण्याची मागणी मोठया प्रमाणात वाढलेली आहे. असे असतानाच ; खासगी टॅंकर चालकांकडून मोठया इंधनदरवाढ तसेच इतर कारणे पुढे करत पाण्याचे दर वाढविण्यात आले आहेत.
त्यामुळे नागरिकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत असून पाणी कपातीच्या काळात पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वडगाव खुर्द येथील टँकर पॉईंटवरून खासगी टँकरधारकांना सवलतीच्या दरात पाणी उपलब्ध करून द्यावे,
अशी मागणी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे गटनेते सोपान ऊर्फ चव्हाण यांच्यासह भाजपचे नगरसेवक सुभाष नाणेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.
शहरातील काही भागांमध्ये अद्यापही पूर्ण दाबाने व क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक परिसरांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनानुसार, अनेक भागांमधील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या असून काही ठिकाणी उपलब्ध होणारे पाणी दूषित व वापरण्यास अयोग्य असल्याचे चित्र आहे. अशा पाण्याच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वडगाव खुर्द येथील टँकर पॉईंटवरून खासगी टँकरधारकांना पाणी भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्या टँकर भरण्यासाठी आकारण्यात येणारे ६५० रुपये शुल्क कमी करून त्यामध्ये ५० टक्के सवलत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
टँकर शुल्क कमी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात पाणी उपलब्ध होईल आणि शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कमी करण्यास मदत होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
धायरीसह शहरातील अनेक भागातील नगरसेवकांकडून पाणीकपातीच्या काळात खासगी टॅंकरला महापालिकेकडून आकारला जाणारा पाण्याचा दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी नियमावली करून याबाबतचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसला तरी हे पाणी नागरिकांनाच दिले जात असल्याने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल- नंदकिशोर जगताप ( पाणी पुरवठा विभाग प्रमुख)






