pune news : पीएमपीला मिळणार हजार ई- बसचे बळ

प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर
पुणे – शहरात एकीकडे मेट्रो मार्गांचा विस्तार होत असताना, पुण्याची जीवनवाहिनी असलेली पीएमपी बस वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने एक हजार ई-बस मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.
शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टीने एकीकडे मेट्रोचा विस्तार करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणखी हजार ई-बसच्या प्रस्तावाला गती मिळण्याची शक्यता आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून अधिकृत प्रस्ताव दिला आहे.
याबाबत नागरी हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, शहरासाठी आवश्यक असणाऱ्या एक हजार ई-बससंदर्भात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. पीएमपीने सादर केलेला प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे दाखल केला आहे. पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली.
चर्चेवेळी कुमारस्वामी यांनी प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत पुढील प्रक्रियेसंदर्भात सूचित केले. पीएमपीचे सक्षमीकरण हा आपला प्रमुख अजेंडा आहे. यादृष्टीने बससाठी आवश्यक असणारे पत्र, राज्य सरकारने रिझर्व बँकेला प्रस्ताव पाठविण्याविषयी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. सरकारने तातडीने तसा प्रस्ताव रिझर्व बँकेला पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले.





