Pune News : ‘प्रत्येकाने नेत्रदान संकल्प करणे आणि नेत्रदान जनजागृतीसाठी चळवळ उभारणे ही काळाची गरज’ – डॉ अनिल दुधभाते
कार्यक्रमास सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, पुणे मनपाचे विद्यमान नगरसेवक प्रसन्न जगताप, विद्यमान नगरसेवक श्रीकांत जगताप, तसेच माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अशोक हरणावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Pune News – २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान देशभरात नेत्रदान जनजागृती पंधरवडा साजरा केला जात आहे. या निमित्ताने डॉ. दुधभाते नेत्रालय अँड रेटिना सेंटर, पुणे यांच्या वतीने नेत्रदान जनजागृतीच्या कार्यात प्रेरणा दूत म्हणून योगदान देणाऱ्या तसेच रुग्णांना उत्कृष्ट नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या पुण्यातील निवडक ऑप्टिशियन व्यावसायिकांचा २५ ऑगस्ट रोजी विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. दुधभाते नेत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमास सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, पुणे मनपाचे विद्यमान नगरसेवक प्रसन्न जगताप, विद्यमान नगरसेवक श्रीकांत जगताप, तसेच माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अशोक हरणावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. दुधभाते नेत्रालयाचे संचालक व प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल व त्यांच्या स्वलिखित डोळ्यांच्या आजारावरील सुंदर असे स्वलिखित ‘नेत्रकोष’ या पुस्तकाची प्रत देऊन सन्मान केला. यानंतर गिरीश वसेकर यांनी प्रभावी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश, नेत्रदानाचे महत्त्व आणि समाजामध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याची गरज याविषयी विचार मांडले आणि आजच्या कार्यक्रमाचे महत्व विषद केले.
तसेच डॉ दुधभाते नेत्रालयाच्या 15 वर्षाच्या आजवरच्या प्रवासात डॉ अनिल दुधभाते यांनी एक लाखापेक्षा जास्त शस्त्रक्रिया , एक हजारा पेक्षा जास्त मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे आणि सहा लाखापेक्षा जास्त रुग्णांची नेत्र तपासणी केली आणि सर्वाना स्पष्ट आणि सुंदर दृष्टी दिली याचा सर्वांना आनंद असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रसन्न जगताप यांनी डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या उत्कृष्ट सेवेचे कौतुक करताना स्वतःच्या डोळ्यांचे ऑपरेशन याच नेत्रालयात झाल्याचे अभिमानाने सांगितले. “आज मला चष्म्याविना अतिशय छान दिसते,” असे सांगत त्यांनी डॉ. दुधभाते व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानले.
श्रीकांत जगताप तसेच अशोक हरणावळ यांनीही डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या उत्कृष्ट नेत्रसेवेचे आणि सामाजिक बांधिलकीतून सुरू असलेल्या नेत्रदान जनजागृती अभियानाचे कौतुक केले. यानंतर डॉ. दुधभाते नेत्रालयाचे संचालक डॉ. अनिल दुधभाते यांनी भारतातील नेत्रदानाची गरज, उपलब्ध नेत्रांची संख्या, नेत्रदानाबाबत समाजात असलेले गैरसमज आणि जनजागृतीचे महत्त्व याबाबत महत्त्वपूर्ण माहिती व आकडेवारी उपस्थितांसमोर मांडली.
“नेत्रदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता येतो. या महान कार्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे व नेत्रदान जनजागृती आणि नेत्रसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या ऑप्टिशियन व्यावसायिकांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे डॉ. दुधभाते यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात डोळ्यांचे महत्त्व आणि नेत्रदानाचे सामाजिक महत्त्व विशद केले. डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उत्कृष्ट नेत्रसेवेबरोबरच नेत्रदान जनजागृतीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले व विशेष म्हणजे विजय कुंभार सरांनी ही
नेत्रदानाचा फॉर्म घेऊन भरून देणार असल्याचे सांगितले.
या सुंदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शीतल हिराळकर यांनी केले, तर तन्मय करंजकर यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी उपस्थित सर्व ऑप्टिशियन व्यावसायिक तसेच मान्यवरांना नेत्रदान संकल्पाचे फॉर्म देण्यात आले. नेत्रदानाचा संदेश समाजाच्या अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. नाश्ता व चहापानाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियंका एडके, गणेश मोटे ,कोमल भोसले, गौरी निमकर, शीतल हिराळकर, गिरीश वसेकर, मार्केटिंग टीम तसेच डॉ. दुधभाते नेत्रालयातील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.





