Pune news : “शांतता… पुणेकर वाचत आहेत’; पुणेकर एक तास वाचनात होणार रममाण

Pune news – राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे दि. १४ ते २२ डिसेंबर या दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. यात “शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या अनोख्या उपक्रमाचे दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. वाचनसंस्कृती बळकट करणारी या चळवळीत तथा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजक राजेश पांडे यांनी रविवारी केले.
या वेळी प्राचार्य संजय चाकणे आणि आनंद काटीकर उपस्थित होते. पांडे म्हणाले, “या उपक्रमाला मागील वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी देखील हजारोंच्या संख्येने पुणेकर यामध्ये सहभागी होतील, यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे शहरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे.
पुणे शहरातील सर्व विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्था या सर्वांना यामध्ये सामावून घेण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील सर्व रुग्णालये, सार्वजनिक गणेश मंडळे, ग्रंथालये, सर्व शासकीय कार्यालये, खासगी आणि सरकारी आस्थापने तसेच पुणे शहरातील सर्व मोठे चौक, कलाकार कट्टा, पर्वती, शनिवार वाडा, सारसबाग यासह पुणे शहरातील सर्व ऐतिहासिक स्थळांवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
येथे करा नाव नोंदणी !
या उपक्रमात कुठे आणि कोणते पुस्तक वाचले याची माहिती पाठविण्यासाठी https://pbf24.in/register ही लिंक आणि क्यूआर कोड देण्यात आले आहे. यावर माहिती पाठविणाऱ्यांना “शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.





