Pune news : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विश्वकर्मा विद्यापीठात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २०२६’
या मेळाव्यात बँकिंग, सेवा, उत्पादन, ऑटोमोबाईल, वित्त, माहिती तंत्रज्ञान तसेच संलग्न उद्योग क्षेत्रातील ४० हून अधिक आघाडीच्या कंपन्या सहभागी होणार असून युवकांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Pune news : युवकांच्या रोजगारक्षमतेला चालना देणे आणि शिक्षण व उद्योग क्षेत्रातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एज्युनेट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलै रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे.
हा रोजगार मेळावा बुधवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.००या वेळेत विश्वकर्मा विद्यापीठ, कोंढवा येथेबिल्डिंग क्रमांक ०२ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बँकिंग, सेवा, उत्पादन, ऑटोमोबाईल, वित्त, माहिती तंत्रज्ञान तसेच संलग्न उद्योग क्षेत्रातील ४० हून अधिक आघाडीच्या कंपन्या सहभागी होणार असून युवकांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या मेळाव्याविषयी बोलताना विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मुकुंद कुलकर्णी म्हणाले, ” विश्वकर्मा विद्यापीठाने महाराष्ट्र शासन आणि एज्युनेट फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित केलेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ हा शिक्षण आणि अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थी आणि युवकांना देशातील आघाडीच्या उद्योगसंस्थांशी थेट संवाद साधण्याची आणि रोजगाराच्या संधी मिळविण्याची प्रभावी संधी उपलब्ध होत आहे. अशा सहकार्यांद्वारे उद्योगाभिमुख, कौशल्यसंपन्न आणि रोजगारक्षम पदवीधर घडविण्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या ध्येयाला बळकटी देत भविष्याभिमुख मनुष्यबळ तयार करण्यासाठी विश्वकर्मा विद्यापीठ कटिबद्ध आहे.”
यामध्ये पॉलिटेक्निक, आयटीआय, बीबीए, बी.कॉम., एम.कॉम., एमबीए, बीसीए, एमसीए, बी.एस्सी. आणि एम.एस्सीया अभ्यासक्रमांचे २०२३ ते २०२६ या कालावधीत उत्तीर्ण झालेले किंवा अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. मेळाव्यात*ऑन-द-स्पॉट मुलाखती, नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद, करिअर मार्गदर्शन तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवादाची संधी उपलब्ध होणार आहेत.
या रोजगार मेळाव्याचे संयोजक तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. कैलास पाटील म्हणाले, “विश्वकर्मा विद्यापीठातील ‘रोजगार मेळावा २०२६’ च्या माध्यमातून हजारो तरुणांना त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालण्याची आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घेऊन आपली कौशल्ये आणि त्याअनुरूप असलेले काम मिळवण्याचा प्रयत्न करावा.”
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २०२६ हा विश्वकर्मा विद्यापीठाच्या कौशल्य विकास, उद्योग सहकार्य आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. उद्योग संस्था, कौशल्य विकास यंत्रणा आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या मेळाव्याचा उद्देश आहे.
तसेच भारताच्या कुशल, सक्षम आणि भविष्याभिमुख मनुष्यबळ निर्मितीच्या राष्ट्रीय ध्येयालाही हा उपक्रम हातभार लावणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





