Pune News | मराठा आरक्षणामुळे विरोधक गपगार ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची खोचक टीका

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने ठोस निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत केवळ संभ्रम पसरवणाऱ्या विरोधकांची बोलती बंद झाली आहे. कमी संख्येमुळे सध्या त्यांच्याकडे काही काम उरलेले नाही आणि सरकारच्या निर्णयामुळे ते पूर्णपणे गपगार झाले आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विरोधकांवर जोरदार टीका केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हा कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार बाबाजी काळे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले की, आरक्षणाच्या निर्णयावर हे काय बोलले, ते काय बोलले, अशी प्रतिक्रिया देण्याची स्पर्धाच विरोधकांमध्ये लागली होती. यातून ते चुकीची माहिती देत समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, सरकारच्या निर्णयाने त्यांचा राजकीय फायदा घेण्याचा डाव फसला आहे.
डिसेंबर-जानेवारीत निवडणुका..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत देत अजित पवार म्हणाले की, २०२२ मध्येच या निवडणुका व्हायला हव्या होत्या. मात्र, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या लांबल्या. आता, न्यायालयाच्या आदेशामुळे डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारी महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे आणि निवडणुकीसाठी सज्ज राहावे.
पुणे जिल्हा अव्वल आलाच पाहिजे..
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा नेहमीच पहिला, दुसरा क्रमांक असतो. आता, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पुणे जिल्ह्याचाच पहिला क्रमांक आला पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकारी जरी सांगलीचे असले, तरी आता तुम्ही पुण्याचे प्रतिनिधित्व करीत आहात. त्यामुळे कोणत्याही स्थितीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी प्रयत्न करा, अशा शब्दांत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.





