Pune News : एक गाव, एक विचार! आडाचीवाडीने पाणंद रस्ते खुले करत शेतीतला अडथळा केला दूर

पुणे : पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण, वाहतुकीच्या अडचणी आणि त्यातून होणारे वाद हे शेतकऱ्यांसमोरील मोठे प्रश्न आहेत. पण पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी या गावाने हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून महाराष्ट्रासाठी आदर्श निर्माण केला आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन सर्व १५ पाणंद रस्ते खुले केले. सातबाऱ्यावर नोंद करून घेतली, रस्त्यांचे क्रॉकिटीकरण केले आणि दुतर्फा वृक्षलागवडही केली.
शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातून बाजारात नेण्यासाठी पाणंद रस्ते आवश्यक असतात. मात्र गेल्या काही वर्षांत या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली. त्यामुळे वाहतूक अडचणीत आली, शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले आणि महसूल विभागाकडे दावेही वाढले. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम सुरू केली.
या मोहिमेला आडाची वाडी गावाने पहिल्याच टप्प्यात प्रतिसाद दिला. गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव केला. सर्वानुमते १५ रस्ते खुले करण्याचे ठरले. भूमी अभिलेख विभागाने रस्त्यांची मोजणी केली. जिओ-फेनन्सिंग करून नकाशे तयार केले. सर्व रस्त्यांची रुंदी २० फूट करण्यात आली. सर्व्हे नंबरनुसार सातबाऱ्यावर ‘ग्रामस्थांची वहिवाट’ अशी नोंद घेण्यात आली. रस्त्यांना आप्तस्वकीयांची नावे न देता महापुरुषांची नावे देण्यात आली. आडाची वाडीने एकाच दिवशी १५ पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करून, सातबाऱ्यावर नोंद घेतली. त्यामुळे पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम पूर्णपणे यशस्वी केली.गावचे भूमिपुत्र व रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी यासाठी पुढाकार घेतला.
शेतीमालाची वाहतूक करणे सोईचे जावे यासाठी रस्त्यांचे सिमेंट क्रॉकिटीकरण देखील करण्यात आले. जेणेकरून भविष्यात या रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये आणि कायमस्वरूपी खुले राहावे, हा त्यामागे उद्देश असल्याचे आडाचीवाडीचे सरपंच सुवर्णा पवार आणि उपसरपंच मोहन पवार यांनी सांगितले.‘आडाचीवाडी गावाने शेतकऱ्यांच्या सहमतीने पाणंद रस्ते खुले करून नवा आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही त्यापासून प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
पाणंद रस्त्यांच्या खुले करण्यावर नुसता भर न देता त्या माध्यमातून गावात रोजगार निर्मिती कशी होईल, यांची देखील काळजी घेतली. रस्त्याच्या दुतर्फा नारळ व जांभळाच्या एक हजार झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. झाडांच्या संगोपनासाठी ‘मनरेगा’ अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २०० झाडामागे एक अशा पाच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.





