Pune News : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी एक अपर पोलीस आयुक्त आणि दोन उपायुक्त; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पुणे – पुणे शहरातील वाहतूक प्रचंड वाढलीय. त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येणे आवश्यक आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा झाल्यावर पुणे शहरात वाहतूक विभागासाठी एक अपर पोलीस आयुक्त आणि दोन वाहतूक उपायुक्त देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणविस यांनी जाहिर केले. राज्यात फक्त मुंबईमध्येच वाहतूक विभागासाठी अपर पोलीस आयुक्त आणि एकापेक्षा जास्त वाहतूक उपायुक्त आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालय आणि पुणे शहराअंर्गत नव्याने मंजुर झालेल्या ७२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुक्रवारी शिवाजीनगर मुख्यालयात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आदी उपस्थित होते
राज्याच्या इतिहासातील रेकॉर्ड : एकाच शहरात एकाच दिवशी सात पोलीस ठाणी
पोलीस खात्याच्या आकृतीबंधात १९६० सालानंतर कोणताही बदल झाला नव्हता. यामुळे नवीन आकृतीबंध तयार करणे आवश्यक होते. तब्बल ६३ वर्षानंतर नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला. यामध्ये लोकसंख्येनूसार पोलिस ठाण्याची आणि कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेण्यात आली.
निकष तयार करुन पुढील कार्यवाही सुरु केली. नवीन पोलीस ठाणे तयार करण्यावर एकप्रकारे अघोषीत बंदीच होती. मात्र २०१४ साली गृहमंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यावर नवीन पोलीस ठाणी तयार करण्यास सुरवात केली.
पुणे शहरात एकाच दिवसात सात पोलीस ठाण्याचे उदघाटन हे राज्याच्या इतिहासातले रेकॉर्ड आहे. इतकेच नव्हे तर माझ्या कार्यकाळात मी ४० हजार लोकांची पोलिसांमध्ये भरती केली आहे. हे एक प्रकारे गुणात्मक परिवर्तन आहे





