Pune News : दसऱ्यानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे पहिल्यांदाच होणार भव्य रावण दहन सोहळा

पुणे : यंदाच्या दसऱ्याचे औचित्य साधून श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे १२ ऑक्टोबर रोजी (शनिवारी) प्रथमच भव्य रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांसाठी हा सोहळा खास असून, मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.
दसरा म्हणजे चांगुलपणाचा विजय, दुष्ट प्रवृत्तींचा अंत होय आणि या दहन सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकून त्यांचा नाश करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. रावण दहनाच्या या प्रतीकात्मक सोहळ्यात रावणरूपी १० प्रमुख सामाजिक समस्यांचा अंत करण्याचे प्रतिकात्मक चित्रण केले जाणार आहे. या समस्यांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे.
१. सामाजिक भेदभाव
२. बेरोजगारी
३. मानसिक ताण- तणाव
४. बालशोषण
५. पर्यावरण असंतुलन
६. महिलांवरील अत्याचार
७. व्यसनाधीनता
८. सायबर क्राईम
९. ज्येष्ठ नागरिकांची उपेक्षा
१०. डिजीटल उपकरणांचे व्यसन
हे रावणरूपी प्रश्न समाजाच्या प्रगतीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यामुळे या रावण दहनासोबतच या समस्यांचा नाश होवो आणि समाजात सुख, शांती व समाधानाचे वातावरण नांदो, अशी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात येणार आहे. याचबरोबर, या वर्षी श्री महालक्ष्मी मंदिरातील भव्य कल्पवृक्ष सजावट देखील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
भक्तगणांनी या पवित्र जागेवर येऊन देवींच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करून, धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. दिनांक १२ ऑक्टोबर, २०२४ (शनिवार) रोजी दसरा व विजयादशमीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे येथे रात्री ९.३० वाजता हे रावण दहन करण्यात येणार आहे.
पुणेकरांनी या ऐतिहासिक रावण दहन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, आणि श्री महाकाली यांच्या साक्षीने या कार्यक्रमाचे साक्षीदार बनावे, अशी विनंती मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. हा सोहळा फक्त धार्मिक कार्यक्रम न राहता, सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरावा, अशी मंदिर समितीची अपेक्षा आहे.





